जेव्हा राज्यपाल स्वतः फोन करतात

हॅलो मोटोरोला… ट्रिंग ट्रिंग ट्रिंग … बाईक चालवता चालवता अचानक जोर जोराने मोबाईल वाजू लागला …. बाईक सुरु केल्या पासून गेल्या ५ मिनिटांमधला हा चौथा फोन.. आधीचे तीनही फोन बाईक बाजूला घेऊन उचलले तर जाहिरातींचे निघाले , हा देखील तसाच असेल असे समजून मी तो एकदा कट केला आणि एकदा उचलला नाही ..

     थोड्याच वेळात फोन  व्हायब्रेट झाला आणि एक मेसेज आल्याचं कळलं..मी दुर्लक्ष केलं आणि बाईक पुन्हा चालू करून घरी जायला निघालो.. घरी आलो, फ्रेश झालो, जेवण वगैरे झालं आणि फोन वर आलेले मेसेज बघण्यासाठी फोन उचलला .. एक मेसेज unknown नंबर वरून आला होता.. तो उघडला .. त्यात जे लिहिलं होत ते बघून मी उडालोच … मेसेज होता..

   ”आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये मी तुमची पर्शिअन बद्दलची जाहिरात बघितली. मी तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही उचलला नाही. कृपया मला फोन करावा. धन्यवाद , राम नाईक , माजी राज्यपाल, उत्तर प्रदेश”

  आधी मला कळलंच नाही हे नक्की काय आहे? फसवणूक आहे कि अजून काही… म्हणून मी तो नंबर तपासून बघितला तर तो खरा निघाला. मी लगबगीने त्या नंबरवर फोन केला. तिशीतल्या तरुणालाही लाजवेल इतका ९० वर्षाच्या दुसऱ्या तरुणाचा खणखणीत आवाज समोरून ऐकू आला.

”नमस्कार मी राम नाईक”

सुरुवातीला मी त्यांचीही माफी मागितली फोन उचलू न शकल्या बद्दल दिलगिरी व्यक्त केली.. आणि त्या नंतर आम्ही जवळपास अर्धा तास बोलत होतो…

  त्यांचे चरैवेति !चरैवेति ! हे पुस्तक साधारण १५ भारतीय आणि पाश्चिमात्य अशा विविध भाषांमध्ये प्रकाशित झाले होते, त्यात एक पर्शियन भाषा देखील होती. जेव्हा स्प्रेडींग नॉलेजतर्फे पर्शिअन शिकवले जाते हे वर्तमानपत्रामध्ये वाचल्यावर कळले तेव्हा लगेच त्यांनी फोन करून त्या बद्दल चौकशी केली.            

   माझ्या बद्दल , स्प्रेडींग नॉलेजबद्दल माहिती घेतली आणि स्प्रेडींग नॉलेजच्या सगळ्या उपक्रमांबद्दल शुभेच्छा देखील दिल्या.. त्यांना आपले पुस्तक मला पाठवायचे असल्याने, माझ्या कडून त्यांनी माझा पत्ता घेतला..

  काही दिवस गेले.. आणि अचानक एक पोस्टमन एक मोठालं पाकीट घेऊन आला.. त्यावर माझा पत्ता आणि खाली अजून एक पत्ता होता आणि त्यावर राम नाईक, माजी राज्यपाल उत्तरप्रदेश. लिहिलं होत.. मी लगेच ते पाकीट उघडलं आणि आत मला ३ गोष्टी दिसल्या..

श्री. राम नाईक यांच्या स्वाक्षरीतली अतिशय वाचनीय अशा चरैवेति !चरैवेति या पुस्तकाची मराठी आवृत्ती ,  कर्मवीर राम नाईक या अतिशय सुंदर अशी बांधणी केलेल्या आणि भारतातील राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अनेक मुख्यमंत्री आणि अनेक जेष्ठ श्रेष्ठ व्यक्तींचे लेख असलेल्या पुस्तकाची एक प्रत आणि खास श्री. राम नाईक यांनी माझ्यासाठी लिहिलेले एक पत्र. या तीन गोष्टी त्यात होत्या.. आणि शेवटी, पुस्तके कशी वाटली याचा अभिप्राय कळवावा.. असे देखील लिहिलेले होते. 

  दोनही पुस्तके अतीव सुंदर आहेत..बराचश्या गोष्टी ज्या आता नॉर्मल झाल्या आहेत या सगळ्यांची मुहूर्तमेढ श्री. राम नाईक यांनी केली हे बघून आश्चर्य आणि अभिमान वाटलं. अशक्यप्राय वाटणारी कामे,  प्रशासनाच्या उदासीन वृत्तीमुळे न झालेली कामे, ही श्री.राम नाईक यांच्या प्रयत्नांमुळे तडीस गेली… पैकी २ कामांचा उल्लेख इथे करावासा वाटतो तो म्हणजे..

१. बॉंबेचे मुंबई नामांतर हे फक्त राम नाईक यांच्यामुळे झाले आणि

२. १९९१ आधी भारतीय संसदेमध्ये ‘जण गण मन ‘ आणि ‘वंदे मातरम’  हे कामकाजाच्या आधी आणि शेवटी गायले जात नव्हते ( आश्चर्य आहे नं !!) पण हे फक्त श्री. राम नाईक यांच्या प्रयत्नांमुळे गायले जाऊ लागले..

  पुस्तके वाचून झाल्यावर त्यांना पत्र लिहून अभिप्राय देखील कळवला… नुसतच फोन करून सांगणं मला  जरा अप्रशस्त वाटलं.. आणि इ  मेल कदाचित ते बघणार नाहीत असा मला वाटलं…

दुसऱ्या दिवशी लगेच त्यांचा मेल आला .. (माझे पत्र मी स्प्रेडींग नॉलेजच्या लेटरहेड वर दिले असल्याने त्यावर इ मेल ऍड्रेस होता) ,

 पत्रावर नेहमी दिनांक लिहावी हा संदेश त्यांनी दिला तसेच आपल्या दोघांचाही ईमेल असताना पोस्टाद्वारे पत्र पाठवून पैसे आणि वेळ का वाया घालवला? असाही सल्ला त्यांच्याकडून मिळाला.. आपण एखाद्याविषयी काय विचार करतो आणि ती व्यक्ती अशी असते यातली तफावत जाणवली.. मला वाटलं ९० वर्षाचे आहेत, कदाचित ईमेल वगैरे जास्त काही माहित नसेल… पण त्यांचा उत्साह, ज्ञान, आणि नवीन गोष्टी स्वीकारून आत्मसात करण्याची वृत्ती ग्रेटच आहे.

इ मेलच्या शेवटी मला त्यांनी अजून एक मोलाचा संदेश दिला..

”There is always a better way of doing this’’ 

मला वाटत या  एका ओळीच्या संदेशामध्येच त्यांनी आजपावेतो ज्या काही अचाट, आश्चर्यकारक, समाजहिताच्या, लोकोपयोगी, कल्पना कशा राबवल्या असतील याची प्रचिती येते..

शेवटी आयुष्य हे देखील प्रवाही असत आणि त्यामुळेच ”There is always a better way of doing this’’ असे म्हणत एक गोष्ट आयुष्यात नेहमीच गाठीशी बांधावी ती म्हणजे …

  चरैवेति! चरैवेति!

Loved it? Share this article

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *